हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. मर्द होतात तर वेगळा पक्ष का काढला नाही? केवळ 40 आमदार आणि 10 ते 12 खासदार म्हणजे शिवसेना नाही. पण लक्षात ठेवा हर कुत्ते के दिन आते है, अशा शब्दात शिवसेना खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपवर टीका केली.
निवडणूक आयोगाने काल शिवसेना चिन्हांबाबत शिंदे गटाच्या बाजूने महत्वाचा निर्णय दिला. आयोगाच्या या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली. यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेना ही शिवसेना आहे. त्यांनी कितीही पाट्या पुसण्याचा प्रयत्न केला तरीही रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही. तो धनुष्यबाण त्याच्या छाताडावरच पडणार आहे.
या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली आहे की, राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्षाची व्याख्या काय? एक पक्ष 50 वर्षांपासून उभा आहे. तो पक्ष घटनेनुसारच चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार-खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले. अशावेळी तो पक्ष त्यांचा कसा होऊ शकेल? हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ लोकशाहीत आज आली आहे.
बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना; राऊतांचा राणेंना टोला
यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला. मी कालपासून कोकणात आहे. काल कणकवलीत आलो. कोकणात शिवसेना जागच्या जागी आहे. इथेही आपण पाहात आहात काल संध्याकाळी निकाल लागला आणि निवडणूक आयोगामधल्या पोपटरावांनी परस्पर ठरवलं की शिवसेनेची मालकी कुणाकडे द्यायची. त्यानंतर कणकवली, सिंधुदुर्ग या ठिकाणी लगेच काही लोकं गेले. वृत्तपत्रात फोटो पाहिले जल्लोष लिहिलं होतं. मोजून सात चेहरे होते. त्यात एक अब्दुला नाचत होता. जे शिवसेना आधीच सोडून गेले आहेत ते फटाके उडवत नाचत आहेत. अशा लोकांनी शिवसेना वाढणार नाही. असे अब्दुल्ला घेऊन शिवसेना वाढणार आहे का? असा सवाल राऊत यांनी राणेंचे नाव न घेता केला.
उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती
यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना भवनबाबत प्रतिक्रिया दिली. शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा कुठेही जाणार नाहीत. शिवसैनिक तिथेच बसतील. तिथेच बसून काम पाहतील. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत. तेच आमचे शिवसेनाप्रमुख आहेत. हे निवडणूक आयोग ठरवणार नाही, हे दुसरं कोणीही ठरवणार नाही. त्यांची नेमणूक बाळासाहेब ठाकरे हयात असताना झालेली आहे. आम्ही सगळ्यांनी यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. कोण शिंदे गट त्यांनी स्वतःचं पहावं. त्यांनी स्वतःला ब्रिगेडिअर, जनरल किंवा एअर व्हाईस मार्शल म्हणून जाहीर कराव”, असे राऊत यांनी म्हंटले.