हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “मुंबईला ओरबडण्याचा, महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे हे केंद्र सरकारला पाहवत नाही. मुंबईचा अपमान करणे हे कितपत योग्य आहे,” अशी टीका राऊतांनी केली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक राज्याचा विकास व्हावा ही आमची भूमिका आहे तरच देशाचा विकास होईल. मात्र, इतर राज्याचा विकास करत असताना मुंबईवर अन्याय का केला जात आहे. त्याचा अपमान करणे कितपत योग्य आहे. काँग्रेसच्या राजवटीत झाले नाही त्यापेक्षा जास्त ताकदीने मुंबईला ओरबडण्याचा, महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा हा प्रयत्न आहे.
देशात आर्थिक प्रगतीत मुंबईचे महत्वाचे योगदान आहे. मुंबई देशाला २.५ लाख कोटी रुपये देत आहे. तुम्ही तुमच्या पैशांनी इतर राज्यांचा विकास करा. आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका. प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर अन्याय का केला जात आहे? मुंबई शिवसेनेच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी हे सुरु आहे का? असा सवालही यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.