हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलंय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर-सांगली खेचून नेण्याची भाषा केली तरी सरकार तोंड शिवून बसलंय आणि भाजपाचे महाप्रचारक महिलांविषयी बोलतात तरी सरकार गप्प बसलंय. त्यामुळे या सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का?, असा थेट सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात चाललंय काय? या ठिकाणी जे चालल आहे त्याबद्दल संतप्त वातावरण आहे. सरकार आहे कुठे? आज बुलढाण्यात आम्ही जनतेसमोर बोलणार आहेत. छत्रपती शिवरायांसारखा वीरपुरुष ज्या मातेने दिला, त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या भूमीत आजची सभा आहे. त्या भूमीत फक्त निष्ठा आणि इमान याचंच बीज आहे. तिथे बेईमानांना थारा नाही. अशा विदर्भ आणि मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांनी विराट सभा आयोजित करण्यात आली आहे.
संजय राऊत म्हणाले, खरं म्हणायचं झालं तर ठाकरे हेच खरं सरकार आहे. आम्ही सगळे आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांशी संवाद साधायला बुलढाण्यात जात आहोत. त्या ठिकाणी जाहीर सभेतून उद्धव ठाकरे अनेक विषयांवर भूमिका व्यक्त करतील. रामदेव बाबांनी महिलांबाबत लज्जास्पद विधान केल्यावर अमृता वहिनी गप्प कशा बसल्या. बोलणाऱ्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे होती. एका बाजूला महिलांबाबत सक्षमीकरणाचे कायदे करायचे आणि दुसरीकडे यावर मूग गिळून का गप्प बसले? असा सवाल राऊत यांनी केला.