हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. त्याचा आज राऊतांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटलांच्या टीकेला राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्या इतकी व्यक्तीमत्त्वाची उंची गाठावी. तुमच्यासारख्या टेकड्यांना सह्याद्री किंवा हिमालयाची उंची लक्षात येणार नाही,” असे राऊतांनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांनि केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम सुरुच आहे. उद्या ते पंतप्रधान मोदी यांच्या सोबतच्या बैठकीत सहभागी होतील, ते आपण स्वत: पाहालच. राहिला प्रश्न शरद पवार याच्याबद्दल आपण जे काही बोललात त्याचा. शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्याइतकी व्यक्तीमत्त्वाची उंची गाठावी. तुमच्यासारख्या टेकड्यांना सह्याद्री किंवा हिमालयाची उंची लक्षात येणार नाही.
एखादी व्यक्ती फक्त पंतप्रधानपदावर बसली म्हणून मोठी होत नाही. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची ही पंतप्रधान होण्यापूर्वीच मोठी होती. अनेक चांगल्या व्यक्ती पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत हेही लक्षात घ्यावे, असे राऊत यांनी म्हंटले.