हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नुकतीच शिवसेनेवर टीका केली. मुंबईत अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर होता, त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही, असा टोला शिवसेनेला लगावला होता. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पटोले यांना प्रत्युत्तर दिली आहे. “मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता हे नाना पटोले यांना तरी आठवतं का? त्यांनी काँग्रेसचा अभ्यास केला पाहिजे. एकेकाळी काँग्रेसचे मुंबईवर राज्य होते पण तेव्हा मुंबई काँग्रेसला नेतृत्व होते पण मुंबईचा राजा शिवसेनाच आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, सोमय्या आमच्या सहकार्यांवर कुटुंबावर तोंड फाटेपर्यंत बोलतात. माझ्या मुलींच्या नावाने वायनरी फॅक्टरी आहे असा आरोप केला, आम्ही अजून शोधतोय ती आहे कुठे? किरीट सोमय्यांची भविष्यात जी प्रकरणे पुढे येतील ती पाहिल्यानंतर रस्त्यावर लोक त्यांना फटकावल्या शिवाय राहणार नाहीत.
संभाजीराजेंनी महाविकास आघाडीत सामील व्हावे
यावेळी राऊत यांनी संभाजीराने यांना आवाहन केले. राऊत म्हणाले की, संभाजीराजे यांनी एकटं लढण्याची घोषणा केली आहे. त्यांना एवढंच सांगतो की, त्यांना अपक्ष लढायचे असेल तर त्यांनी त्यांच्या हिमतीवर लढावे. महाविकास आघाडीने सहावी जागा लढायची हे एकदा ठरवले आहे. संभाजीराजेंविषयी आमच्या मनात आदर आहे. त्यांनी महाविकास आघाडीत सामील व्हावे, असे राऊत यांनी आवाहनही केले.
काय म्हणाले होते नाना पटोले?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका करताना म्हंटले होते की, दरवर्षी पावसात मुंबई पाण्याखाली येते. अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर राहिला आहे. त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही. तसेच त्यांनी सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाली आहे. आम्ही कोर्टात याबाबत न्याय मागण्याची भूमिका घेणार आहोत, असेही पटोले यांनी म्हटले होते.