हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाने राज्यात शिवसेना- भाजप युती होणार का अशी शक्यता निर्माण झाली असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र या शक्यतेतील हवाच काढून टाकत भाजपवरच निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?, असा सवाल करत संजय राऊत यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.
शिवसेना भवनात जाऊन तोडफोड करण्याची भाषा काही लोकांनी केली. काही केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केली. अशा विचारधारेचा हा पक्ष आहे. ते लोक शिवसेनेला दुश्मन मानतात, त्यांच्याशी युती कशी होणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला. हे सरकार पडेल, या भ्रमात कुणी राहू नये असा टोला राऊतांनी भाजपाला लगावला.
मुख्यमंत्री कुठेही म्हटलेले नाहीत की नवीन आघाडी होईल, आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ज्यांना भावी सहकारी व्हायचंय, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. असे राऊत म्हणाले. तसेच शिवसेना शब्दांची पक्की असते. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही, शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही अस म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.