हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात पुन्हा एकदा झुंपल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले. संजय राऊत शिरसाट त्यांच्यावरील एका प्रश्नाला उत्तर देताना थुंकले, त्यानंतर प्रत्येकाने तारतम्य पाळलं पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी संजय राऊत यांना दिला. मात्र धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं कधीही चांगलं असं सणसणीत प्रत्युत्तर संजय राऊत यांनी अजित पवारांना दिले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत याना अजित पवारांनी दिलेल्या सल्ल्याबाबत विचारलं असता अजितदादांच बरोबर आहे, पण धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं कधीही चांगलं, संयम राखणं ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचा आदरच करतो. पण ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. आम्ही भोगतो आहोत आणि इतकं सगळं भोगूनही आम्ही जमिनीवर आहोत, आमच्याच पक्षात आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा विचारही येत नाही. संकट आलं म्हणून भाजपसोबत जाण्याचा विचार आमच्या मनातयेत नाही, असा टोलाही संजय राऊतांनी अजित पवार यांना लगावला.
दरम्यान, संजय राऊत यांच्या या खालच्या भाषेतील टिकेबद्दल अजित पवार यांना विचारलं असताना त्यांच्या बोलण्याने आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. ही आपली संस्कृती नाहीये. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मला त्याबद्दल बोलायचंच नाही, असं म्हणत अजितदादानी अधिक बोलणं टाळलं.