हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अनेक कारणांनी चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीसांनी आघाडी सरकावर निशाना साधल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. “महाराष्ट्रात वादळ हे अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळेच झोपले, ते अजून उठलेच नाहीत, आमच्याकडे 170 आमदारांची ताकद कायम आहे. त्यामुळे अधिवेशनात वादळ वगैरे येणार नाही, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विरोधी भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधक वादळ निर्माण करणार असे सांगत आहेत. मात्र, त्यांच्या या सांगण्यामागे यामध्ये काहीही तथ्य नाही. महाराष्ट्रात वादळ हे अडीच वर्षांपूर्वी आले होते. त्यामध्ये सगळेच झोपले, ते अजून उठलेच नाहीत. विरोधक साधी फुंकर मारतात पण त्यांना वादळ आल्यासारखे वाटते. पण महाविकास आघाडीची 170 आमदारांची ताकद कायम आहे. त्यामुळे अधिवेशनात वादळ वगैरे येणार नाही. ठाकरे सरकारला साधा ओरखडाही उठणार नाही, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.
फडणवीसांच्या प्रशाना उत्तर देताना राऊत म्हणाले की, सभागृहात आदळआपट करून प्रश्न सुटणार नाहीत. आम्ही लोकशाही मानतो. लोकसभा आणि राज्यसभेत लोकशाही नसली तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक परंपरा आहे. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, असेही राऊत यांनी म्हटले.