हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. शरद पवार यांचा दाखला देऊन राऊतांनी रोखठोकमध्ये लेख लिहिला आणि तेथूनच या वादाला सुरुवात झाली. या लेखामुळे अजित पवार हे भाजपात जातील अशा चर्चांना उधाण आलं आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. परंतु आपण जिवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असं म्हणत अजित पवारांनी राऊतांना चांगलंच सुनावलं. मात्र आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी एक मोठं विधान करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांच्या म्हणण्याप्रमाणेच संजय राऊत अजित पवारांना महाविकास आघाडीच्या बाहेर करतील असा मोठा दावा त्यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल बोंडे म्हणाले, संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेतले ४० आमदार फुटलेआणि आताही अजित पवार संजय राऊत यांना कंटाळूनच महाविकास आघाडी सोडतील. म्हणजेच शिवसेना फोडण्यासाठी संजय राऊत जबाबदार आहेत आणि महाविकास आघाडी फोडण्यासाठीही संजय राऊतच जबाबदार ठरतील. त्यामुळे त्यांची थोरवी मोठी आहे. त्यांचा वाटा मोठा आहे असा टोला अनिल बोंडे यांनी लगावला.
आता अजित पवारांना महाविकास आघाडीतून बाहेर काढायचं असेल तर संजय राऊत हे निश्चितपणे ज्यांचे ते ऐकतात त्या मोठ्या साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आयडियाने बाहेर काढतील. संजय राऊतांना जस सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते काम करत आहेत. त्यांनी स्वतः सांगितलं आहे कि मी फक्त शरद पवारांचेच ऐकतो, बाकी कोणाच्या बापाला मी ऐकत नाही . शरद पवारांच्या सल्ल्यानेच संजय राऊत यांनी शिवसेना फोडली आणि आता ते महाविकास आघाडी फोडत आहेत असा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं आहे.