हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गृहीत धरत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. या निवडणुकीत भाजपने कितीही अफवा पसरवल्या तरी काहीही होणार नाही. जिंकण्यासाठी जोऱ्या माऱ्या करून मते आणणार का? असा सवाल राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या भाजपकडून महा विकास आघाडीत समन्वय नसल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, त्यांना सांगू इच्छितो की, आमच्या तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. कोणी कसे मतदान करावे याचे निर्णय झाले आहेत. भाजपने कितीही अफवा पसरवल्या तरी त्याचे त्यांना फळ मिळणार नाही
ज्यांच्याकडे दोन मते जास्त आहेत. त्यांना जिंकण्यासाठी 20 मते हवी आहेत. ते कुठून आणणार? चोऱ्यामाऱ्या करूनच मते मिळवणार ना. दहशत आणि दबाव आणूनच मते मिळवली जाणार ना? असा प्रकार होऊ नये म्हणून या आमदारांना आम्ही हॉटेलमध्ये ठेवले आहे. दहशत दबाव हे सर्व प्रकार लोकशाहीत खुलेआम सुरू आहे. पूर्वी लपून छपून करत होते. आता खुलेआम करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.