हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल असं मत राऊतांनी व्यक्त केलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी कोर्टाच्या आवारात शिवसैनिक, माध्यम प्रतिनिधींसोबत त्यांनी अनौपचारिक संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले, नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. या आधीही जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. परंतु नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले. तसेच आपणही मोठे होऊ. लोकांना माहित आहे कि खरी शिवसेना कोणती आहे, त्यामुळे चिन्ह बदललं तरी लोक आपल्याशी जोडले जातील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने मशाल, त्रिशूल आणि उगवता सूर्य या ३ चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाला दिला आहे तर दुसरीकडे शिंदे गटाने यातीलच त्रिशूल आणि उगवता सूर्य या चिन्हावर दावा सांगत ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेत हे आता पाहावं लागणार आहे.