शिवसेनेकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’?? पत्रकार परिषदेसाठी स्क्रिन लावण्याची तयारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज शिवसेना भवनात शिवसेनेकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 4 वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून यावेळी शिवसेनेकडून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणत खासदार संजय राऊतांकडून व्हिडिओ देखील सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण जनतेला याबाबत उत्सुकता लागली आहे.

शिवसेना भवनातील आजच्या पत्रकार परिषदेसाठी एक मोठा स्क्रिन लावण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय राऊत पत्रकार परिषदेत ‘व्हिडिओ बॉम्ब’ फोडणार असल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेसाठी एक पेन ड्राइव्ह घेऊन येणार असून व्हिडिओच्या माध्यमातून गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. आता राऊत नेमका कोणता व्हिडिओ समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, शिवसेना भवनाबाहेर झुकेंगे नही अशी पोस्टरबाजी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये जातील अस म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे ते साडेतीन लोक कोण असा प्रश्न सर्वाना पडला आहे.