मोठी बातमी! मुंबईत कलम 144 लागू; ओमिक्रोनमुळे ठाकरे सरकारचा निर्णय

वेळीच खबरदारी घेतली नाही तर पुन्हा लाॅकडाऊन

मुंबई । कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच भारतात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने एंट्री केल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३२ वर पोहचली त्यामुळे चिंतेत अधिकच भर पडली असून भारतासाठी ओमिक्रॉन व्हेरिएंट किती धोकादायक ठरू शकतो, या व्हेरिएंटमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळणार का?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच अनुषंगाने आतापर्यंतची रुग्णवाढ लक्षात घेत महत्त्वाचे निरीक्षण आरोग्य विभागातून नोंदवण्यात आले आहे.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 11 आणि 12 डिसेंबरला कलम 144 लागू करण्यात आले आहे. या दरम्यान लोकांच्या रॅली, मोर्चे, मिरवणुका आणि वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत CRPC कलम 144 लागू केले. यामुळे पुढील दोन दिवस मोर्चे आणि निदर्शने करण्यास बंदी असेल. आदेशात म्हणण्यात आले आहे की, उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार शिक्षा केली जाईल.

देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्याने करोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंतेत भर पडली आहे. ही स्थिती लक्षात घेत केंद्र सरकारने कोविड नियमांबाबत कठोर संदेश दिला असून पुढचा धोका टाळायचा असेल तर वेळीच सावध व्हा, असे अगदी सुस्पष्ट शब्दांत सांगितले आहे. त्यातून कोविड नियम येत्या काही दिवसांत कठोर केले जातील, असेही संकेत मिळाले आहेत.

केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी यावेळी ओमिक्रॉनबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. २४ नोव्हेंबर रोजी सर्वप्रथम दोन देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर गेल्या १६ दिवसांत ५९ देशांमध्ये ओमिक्रॉनने शिरकाव केला असून रुग्णसंख्या २ हजार ९३६ इतकी झाली आहे. याशिवाय ओमिक्रॉन सदृष्य लक्षणे असलेले ७८ हजार ५४ रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील आरोग्य व्यवस्थेवर येत्या काळात ताण येईल अशी स्थिती नसली तरी ती वेळ येऊ द्यायची नसेल तर आपणा सर्वांनाच खबरदारी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.