शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला; बैठकीत मांडले ‘हे’ 2 प्रस्ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली होती. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्यानंतर निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं पवारांनी म्हंटल होते. त्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे.

मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या बैठीकीसाठी अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रामराजे निंबाळकर, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, राजेश टोपे यांसारखे दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहावं असा ठराव यावेळी निवड समितीकडून मंजूर करण्यात आला आहे. तसेच पवारांचा राजीनामा सुद्धा यावेळी फेटाळण्यात आला आहे. निवड समितीची ही शिफारस शरद पवारांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर पवार नेमकी काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये मुंबईतील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कार्यकर्त्ये चांगलेच भावनिक आणि आक्रमक झाले आहेत. यावेळी एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र शेजारील लोकांनी वेळीच त्याला अडवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.