राष्ट्रवादी – शिवसेना भाजपसोबत जाणार नाही; मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज बैठक झाली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. आणि बारा आमदारांच्या प्रश्नी राज्यपालांकडून अद्यापही निर्णय घेतला गेलेला नाही याबाबत विचार करावा असे त्यांना सांगितले. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजप सोबत जाणार नसल्याचेही यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची उपस्थिती होती. यावेळी ते म्हणाले की, मी आज संसदेत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी याची भेट घेतली. यावेळी दोघांच्यात अनेक विषयावर चर्चा ही झाली. यावेळी मी संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला.

संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे कारण काय? राऊतांवर अन्याय होत असल्याचे मोदींच्या निदर्शनास आणून दिले. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. वास्तविक राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे कारण काय? असे सांगितले.

“गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल नियमाला धरुन काम करत नाहीत. विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचाही प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवला आहे. ही गोष्ट आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर घातली. त्यावर पंतप्रधानांनी या मुद्द्यावर लक्ष देण्याचं आश्वासन दिलं.”असे पवार म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी याची भेट झाली. या भेटीमध्ये दोघांच्यात आज लक्षद्वीप येथील काही मुद्यांवर चर्चा झाली. लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल के पटेल यांचे निर्णय चुकीचे आहेत. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांची माहिती मोदींना दिली असल्याचे फैजल यांनी सांगितले.