हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या आघाडीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, त्यामुळे तो स्वीकारायचा की नाही हा प्रश्नच नाही असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पवारांच्या विधानाचे अनंत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
आज कोल्हापुरात शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर थेट भाष्य केलं. महाविकास आघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांचा कोणताही प्रस्ताव आमच्यापुढे आलेला नाही. आमची जी काही चर्चा झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढण्याची मानसिकता दाखवली आहे असं शरद पवार म्हणाले. पवारांनी यावेळी वंचितचा साधा उल्लेखही केला नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीत येण्याची शक्यता कमी वाटते.
दरम्यान, पवारांच्या विधानानंतर प्रकाश आंबेडकर यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. आमची आघाडी फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे, बाकी कोणाची आमचं घेणंदेणं नाही असा पलटवार त्यांनी केला. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही असं म्हंटल होत, त्यातच आज शरद पवारांनी सुद्धा युतीबाबत प्रस्तावच आला नाही असं म्हणल्यानंतर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील होणार कि नाही या प्रश्न अजून गुंतागुंतीचा झाला आहे.