“शरद पवारांना 30 वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसवता आला नाही”- गोपीचंद पडळकर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

‘राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता वाचवण्यासाठी शरद पवारांना वारंवार त्यांच्याच पक्षातील आमदारांना पक्षात राहण्याच्या विनवण्या कराव्या लागत आहेत. राष्ट्रीय राजकारणात स्वत:ला मोठे नेतृत्व समजणाऱ्या नेत्यांना गेल्या 30 वर्षात राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवता आला नाही. जनतेच्या पाठबळावर सत्तेत येणार नसल्याची खात्री असल्यामुळेच त्यांच्याकडून सत्ता वाचवण्याची धडपड सुरू आहे,’ अशी बोचरी टीका भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

ते आज सांगलीत भाजप नगरसेवकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन 30 वर्षे झाली आहेत. आणि महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला नाही. पावसात भिजून देखील 54 वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या गेली नाही, या उलट भाजपचे आमदार फुटणार,अशी वारंवार चर्चा केली जाते.”

“मात्र अद्याप एकही आमदार फुटलेला नाही. पण आता देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपची एक हाती सत्ता येत आहे. अशा परिस्थिती मध्ये आपल्या 54 आमदारांपैकी कोणीही फुठू नाही, म्हणून शरद पवार वारंवार महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही, असं वक्तव्य करत आहेत.” मात्र त्यांनी भाजपची चिंता करू नये, आपल्या पक्षाची चिंता करावी आणि आपले आमदार फुटू नयेत याची काळजी करावी, असा टोला लगावला आहे.