हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह देशभरातील सर्व स्तरावरील मान्यवरांना बोलवण्यात आले आहे. परंतु या सगळ्यात राम मंदिराच्या लोकांनी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना बोलवण्यात आलेले नाही. याबाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली आहे. “मला राम मंदिर झाल्याचा आनंद आहे मात्र मला या सोहळ्यासाठी निमंत्रण आलेले नाही” असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
बुधवारी अमरावतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, “राम मंदिराबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे, हे बाळासाहेबांच्या तोंडून ऐकलं आहे. मला राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. या मंदिरासाठी अनेकांचे योगदान आहे. मला राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण नाही. मी मंदिरात जात नाही. मंदिरात जाणे ही व्यक्तिगत बाब आहे. त्यासाठी निमंत्रणाची गरज नाही”
त्याचबरोबर इंडिया आघाडी संदर्भात बोलताना, “इंडिया आघाडीची बैठक झाली, तेव्हा राहुल गांधी यांनी पदयात्रा केली. त्यानंतर दुसरी पदयात्रा काढण्यासाठी सूचना केली होती. त्यामुळे ते करत आहेत. तीन राज्याचा निकाल अपेक्षासारखा लागला नाही. पण आता लोक इंडिया आघाडीला पर्याय म्हणून स्वीकारतील. आम्ही एकत्र बसून जागावाटपाचा निर्णय घेऊ” असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, आयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पणाची जल्लत तयारी सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला याच राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकीय वाद देखील पेटला आहे. कारण, राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी मनसे नेते राज ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे मात्र शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना अद्याप आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर, आता शरद पवार यांना देखील लोकार्पण सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले नसल्याचे समोर आले आहेत. ज्याने राजकिय वर्तुळात वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.