महाराष्ट्रात पहिल्या होणाऱ्या सहकार परिषदेचे शरद पवारांनाच निमंत्रण नाही ; ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पहिल्या सहकार परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन करण्यात येणार असून या परिषदेला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रवरामध्ये होणाऱ्या या परिषदेस विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते रावसाहेब दानवे देखील उपस्थित राहणार आहेत. अद्याप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना परिषदेसाठी निमंत्रण दिले गेलेले नाही. मात्र परिषदेचे आयोजक व खासदार शरद पवार यांच्या कुटूंबातील राजकीय संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे त्यांना बोलावले नसल्याची चर्चा होत आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या 18 डिसेंबरला अमित शहा महाराष्ट्रात अहमदनगरला येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सहकाराची सुरूवात झालेल्या प्रवरा या ठिकाणी देशाची पहिली सहकार परिषद होणार आहे तसेच विचारमंथनही होणार आहे.

अमित शहा यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्‍यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांच्‍यासह सहकारी साखर कारखाना, सहकारी बँक, सहकारी पतसंस्‍था क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील महत्वाचे नेते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे-पाटील यांनी या सहकार परिषदेचे आयोजन केले आहे.