हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातून कौतुक होत असलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या चित्रपटाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. ““या चित्रपटामुळे एक विचार मारला जात आहे. त्यात गांधीजी, नेहरू यांचा काय संबंध? दु:ख याचं आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांनी देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे, असे पवार यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काश्मीर फाइल्सबाबत नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विधाने केली आहेत. त्यांनी या चित्रपटाचे खूप कौतुकही केले आहे. मात्र, दु:ख या गोष्टीचे होते की, पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असो त्यांनी देश एक ठेवणे महत्वाचे असते. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरु होते तेव्हा एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता.
ते सभागृहात उपस्थित न राहता चित्रपट पाहायला गेले होते. असा प्रकार सुरु राहिला तर देशात एकता राहणार नाही. तसेच देशातील धर्मनिरपेक्षतेवर भाजपाचा विश्वास नाही. त्यात पाठिंबा भाजपाला मिळाला आणि सत्ता त्यांच्याकडे आली. एक चित्रपट येतो, त्यात काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले आणि ते हल्ले काँग्रेस आणि अल्पसंख्यांकांनी केले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदूंवर अत्याचार झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असंही शरद पवार म्हणाले.