नागपूर प्रतिनिधी । ‘राज्यघटनेतील अनुच्छेद ३७१ मुळे ईशान्येकडील राज्यांत जमीन-घर खरेदी करता येत नाही. हे अनुच्छेद रद्द करा, त्यास आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारला लगावला. बुटीबोरी येथे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणा विधानसभेचे उमेदवार विजय घोडमारे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
पवार म्हणाले, ‘संसदेने अनुच्छेद ३७० रद्द केले. त्यावर भाजपचे नेते आम्हाला विचारतात, तुमचे मत काय आहे? संसदेत अनुच्छेद रद्द करताना केवळ चार-पाच सदस्यांचा विरोध होता. कारण या संदर्भातील निर्णय घेताना काश्मीरच्या लोकांना विश्वासात घ्या, एवढीच त्यांची मागणी होती; परंतु राज्यकर्ते लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काय केले हे न सांगता ३७० करून विरोधकांवर टीका करीत आहेत.
३७० रद्द झाल्याने काश्मीरमध्ये घर, जमीन खरेदी करता येते. याचे आम्ही स्वागतच करतो. पण ३७१ अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. त्यावर तुम्ही का बोलत नाही.’ असं म्हणत एक नवीन खेळणं शरद पवारांनी भाजपपुढे सादर केलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांना राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असून त्या प्रतिसादाचा राष्ट्रवादीला किती फायदा होणार हे येत्या दोन आठवड्यांतच स्पष्ट होईल.