हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे. स्वपक्षीय लोकांनीच शिंदे यांचा पराभव घडवून आणला अशी चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे यांच्या पराभवावर भाष्य केले. शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती अस पवार म्हणाले. महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आलेले असताना पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार पवार म्हणाले, सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. मात्र, मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण त्यांनी ही निवडणऊक गांभीर्यानं घ्यायला हवी होती. त्याचबरोबर पुढच्या तीन-चार महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ शकतात, असे संकेतही पवार यांनी यावेळी दिले.
दरम्यान, शशिकांत शिंदे यांचा ज्ञानदेव रांजणे यांनी अवघ्या एका मताने पराभव केला. ज्ञानदेव रांजणे हे मूळचे शिवेंद्र राजे भोसले यांचे समर्थक मानले जातात. हा पराभव शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारीं लागला. शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक देखील करण्यात आली. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी साताऱ्यात येऊन शशिकांत शिंदे यांच्यासोबत कमराबंद चर्चा केली.