हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिकार्यांनी केल्यानंतर निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं पवारांनी म्हंटल होते. यानंतर आज पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीने फेटाळला आणि त्यांनीच पक्षाचे अध्यक्ष राहावे असा प्रस्ताव त्यांच्याकडे सुपूर्द केला. एकूण सर्व घडामोडी आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतला आहे.
वायबी सेंटर येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपला निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. याबाबत त्यांनी आपले स्टेटमेंटच वाचून दाखवलं. मी घेतलेल्या राजीनाम्याच्या निर्णयांने जनमाणसात तीव्र भावना उलटली . राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्त्ये, पदाधिकारी आणि जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक आणि प्रेम, विश्वास असणारे कार्यकर्त्ये यांनी संघटित होऊन एकमताने मला आवाहन केलं . मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी विनंती मला केली. लोक माझे सांगाती हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दिलेलं प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो.
https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/628139869210299/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदी मी पुन्हा राहावे याचा मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे. मी पुन्हा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारत आहे. मी अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे. पक्षात नवं नेतृत्त्व निर्माण होईल यासाठी काही संघटनात्मक बदल मी करणार आहे असेही शरद पवार यांनी म्हंटल .