हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या राजकीय पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी विरुद्ध मनसे तर शिवसेना विरुद्ध भाजपनेत्यांकडून एकमेकांवर अनेक मुद्यांवरून निशाणा साधला जात असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला असल्याने या निवडणुकीत महा विकास अगदी एकत्रित लढणार का? असा प्रश्न पडला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी “स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या, असे काही जणांचे मत आहे. याबाबत महाविकास आघाडीमध्ये याबाबत पूर्ण चर्चा झाली नाही, असे महत्वाचे विधान केले.
शरद पवार यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निकाल दिला आहे. न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो 15 दिवसांत निवडणुका घ्या असा नाही तर 15 दिवसांत निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करा, असा दिला आहे असे मला वाटते. सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असून यासंदर्भात आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. एकत्र बसून बोलून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.
स्थानिक स्वराज्यनिवडणुकांबाबत जो न्यायालयाने निकाल दिला आहे. यातून अनेक गैरसमज झाले आहेत. वास्तविक पाहता न्यायालयाने असे सांगितले आहार की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत ज्या ठिकाणाहून तयारी केली आहे. त्या ठिकाणाहून पुढे तयारी करावी. मतदान प्रक्रियेला किमान दोन ते अडीच महिने लागणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या, असे काहींचे मत जरी असले तरी काही जणांनी स्वतंत्र लढावे आणि नंतर एकत्र यावे, असे म्हणतात, असे पवार यांनी सांगितले.
अयोध्या दौरा हा राष्ट्रीय प्रश्न नाही : शरद पवार
यावेळी शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, कोणाचाही अयोध्या दौरा हा राष्ट्रीय प्रश्न नाही. कोण अयोध्येला जाणार आहे, मला माहित नाही. माझा नातू देखील अयोध्येत आहे, हे मलाही माहिती नव्हते, असेही पवार यांनी म्हंटले.