हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढवला आहे. या मुद्द्यावरुन शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’तून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “केंद्र सरकारची तिजोरी भरण्यासाठी जीएसटीच्या माध्यमातून जाचक करवसुली सुरु आहे. त्याची तुलना मोगलशाहीतील ‘जिझिया’ करासोबत करावी लागेल. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी म्हणजे नवी मोगलाईच आहे. ‘अच्छे दिन’चे गाजर तर सरकारने केव्हाच मोडून खाल्ले आहे,”अशी टीका शिवसेनेने अग्रलेखातून केली आहे.
अग्रलेखात म्हंटले आहे की, सोमवारपासून सरकारने ज्या अनेक नव्या वस्तूंना जीएसटीच्या जाळ्यात ओढले. गोरगरीब व मध्यमवर्गीयांचे पुरते कंबरडेच मोडायचे असा निश्चय दिल्लीश्वरांनी केलेला दिसतो. सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला नेऊन भिडवल्यानंतर मोदी सरकारने स्वयंपाक घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर ‘जीएसटी’चा हल्ला चढवला आहे. दररोज वापरल्या जाणाऱ्या दही, ताक, पनीर, पॅकबंद पीठ, साखर, तांदूळ, गहू, मोहरी, जव आदी वस्तूवर प्रथमच 5 टक्के जीएसटी लादला गेला आहे.
दुग्धजन्य पदार्थ आणि अन्नधान्याबरोबरच गोरगरीब व कष्टकरी लोक ‘भत्ता’ म्हणून जो चिवडा किंवा मुरमुरे खातात त्यावरही 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. गहू, तांदूळ, पीठ, दही, ताक, पनीर यांसारख्या रोजच्या रोजच्या स्वयंपाकात लागणाऱ्या वस्तू आधीच गेल्या 8 वर्षात महागल्या असताना त्यावर आणखी जीएसटीचा घाव घालून सरकारने नेमके काय साधले? स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्यांनी किमान जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवताना ‘जना’ची नाही, पण ‘मना’ची तरी बाळगायला हवी होती.
5 वर्षांपूर्वी जेव्हा सोपी कर प्रणाली म्हणून सरकारने जीएसटी अस्तित्वात आणला, तेव्हा त्याचे गोडवे गाताना पंतप्रधान मोदी यांनीच जीवनावश्यक वस्तूंना जीएसटी लागणार नाही, असे जाहीर केले होते. या प्रत्येक वस्तूवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय आज त्यांच्याच सरकारने घेतला आहे.