Wednesday, June 7, 2023

मनसे आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही हायजॅक करणार का?; शिवसेनेच्या नेत्याचा सवाल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील खालकर मारुती चौकात उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार आहे. या कार्यक्रमाचे पोस्टर मनसेकडून तयार करण्यात आले असून त्यावर राज यांचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “हिंदू हृदयसम्राट तथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना मनसेने शिवसेना भवनावर दगडफेक केली, त्यांना यातना दिल्या. आता हीच मनसे उद्धव ठाकरे यांचे वडीलही हायजॅक करणार का?, असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.

‘मनसे’कडून केल्या जात असलेल्या राजकरणाबाबत आज शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.  आज पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पेडणेकर यांनी शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करणाऱ्या मनसेचा चांगलाच समाचार घेतला.यावेळी त्या म्हणाल्या की, शिवसेना भवनाला टार्गेट केल्याशिवाय किंवा शिवसेनेवर कुरघोडी केल्याशिवाय मनसेला टीआरपी मिळत नाही.

आता मनसेचे नेते आम्ही ‘बी टीम’ म्हणजे बाळासाहेबांची टीम असल्याचे सांगत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील आहेत. त्यामुळे आता मनसे त्यांनाही हायजॅक करणार का? शेवटी मनसेला बाळासाहेब ठाकरे यांचा आधार घ्यावाच लागला. बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर एका मुस्लीम व्यक्तीला नमाज अदा करून दिली होती. बाळासाहेब ठाकरे मुस्लिमांविषयी इतके उदारमतवादी होते. त्यामुळे मनसेने उगाच कोणाची तरी भूमिका घेऊन बोलू नये, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हंटले.

रवी राणा बालिशपणा कमी करा – पेडणेकर

आज अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले “मुख्यमंत्री ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी. मुख्यमंत्री ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे, त्यामुळे हनुमान जयंतीनंतर आता आपणच मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणारं असे राणा यांनी म्हंटले आहे. त्यांच्या विधानाचा पेडणेकर यांनी समाचार घेतला आहे. राणा यांनी बालिशपणा कमी करावा, असे पेडणेकर यांनी म्हंटले.