हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप खासदारांची जन-आशिर्वाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली जात आहे. मंत्री राणेंनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “महाविकास आघाडीवर भाजप नेते वसुलीचा आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकार शासनाचा जो महसूल आहे तो वसूल करत आहे. पण भाजप नेत्यांना त्यांच्या काळात जी वसुली होत होती, त्याची आठवण येत असेल,” असा टोला सत्तार यांनी लगावला आहे.
शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी आज भाजपवर जोरदार टीकाही केली. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना संकट मोचन हे नाव दिले आहे. अनेक संकटे येत आहेत, तरीही ते उत्कृष्ट काम करत आहेत. देशातील अनेक नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून स्तुती करत आहेत. महाविकास आघाडीवर भाजप नेते वसुलीचा आरोप करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शिवसंपर्क अभियानामुळेच भाजपच्या नेत्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली आहे.
यावेळी केंद्र सरकारवर टीका करताना आमदार सत्तार म्हणाले की, दिल्लीच्या सरकारला आता राज्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे त्यामुळे हे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व्हेमध्ये जनतेशी संवाद कमी झाल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनताच भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे सत्तार म्हणाले.