हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सध्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून निशाणा साधला जातोय. सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांपासून आमदार शशिकांत शिंदे यांनाहीआरोप करण्यात सोडले नाही. सोमय्यांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना एक खळबळजनक पत्रही लिहले. त्यानंतर त्यांनी आज सोमय्यांना टोलाही लगावला. “एकच व्यक्ती का भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडत आहे, दुसरं काही महाराष्ट्रात होत नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात सगळ्यांनी लढाई केली पाहिजे,” असे राऊतांनी यावेळी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून वारंवार भ्रष्टाचाराबद्दल विधाने केली जात आहेत. राज्यात अनेक गोष्टी घडत असतात. महाराष्ट्रात दुसरं काही होत असलेले यांना दिसत नाही. मी काल त्यांना पत्रच पाठवले. त्या पत्रातून राऊतांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील 700 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. भाजपची सत्ता या ठिकाणी आहे. या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला आहे. ईडी, सीबीआय आणि सोमय्यांनी चौकशीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही केली आहे.
भ्रष्टाचाराच्या विरोधात सगळ्यांनी लढाई केली पाहिजे. जे लढतात त्यांच्याकडे अजून काही प्रकरण पाठवावीत असं मला वाटतं. मी हे प्रकरण ईडीकडे देईन. पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यापूर्वीच्या सरकारमधील अनेक लोकांचा सहभाग या घोटाळ्यात आहे, त्याचीही चौकशी सोमय्या यांनी ईडीमार्फत लावावी, असे राऊत यांनी यावेळी म्हंटले.