Tuesday, February 7, 2023

महाराष्ट्राची पुण्याई म्हणून महाराष्ट्र दिनीच ‘हा’ निर्णय झाला- संजय राऊत

- Advertisement -

मुंबई। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली असून आयोगाच्या या निर्णयाचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात आला आहे. आज महाराष्ट्र दिन आहे आणि निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्राची मोठी पुण्याई म्हणून महाराष्ट्र दिनीच हा निर्णय झाला. हा महाराष्ट्रासाठी शुभ संकेत आहे, असं सांगतानाच काल काय झालं हे महत्त्वाचं नाही. आजपासून नवा अध्याय सुरू झाला आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले कि, ”निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात करोनामुळे चिंतेचं वातावरण असताना त्यात अशी अस्थिरता निर्माण होता कामा नये. उद्धव ठाकरेंना निवडून येण्यात कोणतीही अडचण नव्हती. पण करोनाच्या संकटामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला विधान परिषदेच्या निवडणुका घ्यायला सांगितल्या. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आता या घटनेचं कुणीही राजकारण करू नये. ही वेळ राजकारण करण्याची नाही, तर एकमेकांना सांभाळून घेण्याची आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. काल काय झालं हे महत्त्वाचं नसून आजपासून नवा अध्याय सुरू झाला आहे,” असं राऊत यांनी म्हटलं.

- Advertisement -

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ही वेळ एकमेकांना समजून घेण्याची आहे. आज एक नवा अध्याय सुरु होत आहे. महाराष्ट्राचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातच पाच वर्ष राहणार आहे. मग कशाला राजकीय खेळ करायचे. निवडणूक आयोगाने राज्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्रासाठी हा शिवसंकेत आणि शुभनिर्णय आहे” असं सांगतानाच राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचेही आभार मानले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.