हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर जनतेला धीर देण्याचा प्रयत्न करत कोरोना विरोधात राज्य सरकार लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याबाबत ग्वाही दिली. दरम्यान मोदींच्या या मन की बात वरून शिवसेनेने मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती, असा टोला शिवसेनेनं केंद्र सरकारला लगावला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून कोरोनाची दुसरी लाट, त्याविरुद्ध केंद्र व राज्य सरकारे लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याबाबत ग्वाही दिली. ही लढाई सुरू आहे हे खरेच, पण ती सुरू होण्यापूर्वी केंद्राने काही गोष्टींची पूर्वखबरदारी, पूर्वतयारी केली असती तर? तज्ञांनी खूप आधी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला असता आणि आता येईल ती ‘त्सुनामी’च असेल ही दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती, अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.
“अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्यूशनने दिलेला इशारा काळजाचा ठोका चुकविणाराच आहे. या संस्थेने काढलेल्या निष्कर्षानुसार मे महिन्यात हिंदुस्थानात रोजचा कोरोना मृतांचा आकडा पाच हजारांवर पोहोचू शकतो. 12 एप्रिल ते 1 ऑगस्ट 2021 या कालावधीत देशातील कोरोना मृतांची संख्या तीन लाखांच्या पार जाऊ शकते. वॉशिंग्टनच्या या संस्थेने दिलेला हा इशारा आता तरी केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यायला हवा.
गेल्या वर्षीही कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी परदेशी संस्थांनी असे इशारे दिले होते. पण सुदैवाने परिस्थिती आटोक्यात राहिली होती. त्यामुळे या इशाऱयांबाबत सरकार समर्थक मंडळींकडून शेरेबाजीही करण्यात आली होती. मात्र सध्याची परिस्थिती तशी नाही हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल. या तज्ञांच्या इशाऱ्यांनाही गांभीर्याने घेतले नाही. त्याचाच परिणाम म्हणून आज नवे कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या याचे जागतिक विक्रम नोंदविले जात आहेत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
आता सरकारतर्फे देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेद्वारे केला जात आहे, त्यासाठी लष्कराचेही सहाय्य घेतले जात आहे. कोरोना लस, वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू आणि त्याच्याशी संबंधित उपकरणे यांच्या सीमाशुल्कात सूट देण्याचाही निर्णय केंद्राने घेतला आहे. रेमडेसिवीरसारख्या अत्यंत तुटवडा जाणवणाऱ्या इंजेक्शनचाही पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे. हे सगळे ठीकच आहे, पण बेकाबू होऊ पाहणाऱ्या कोरोनाचे काय? हतबल झालेली आरोग्य व्यवस्था, उपचारांअभावी होणारे रुग्णांचे मृत्यू आणि त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबांचे काय? असा सवालही शिवसेनेनं केला आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.