शेतीतलं शिवसेनेला कळतं तरी काय? मोदी विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; निलेश राणेंचा घणाघात

मुंबई । शेती हा काही शिवसेनेचा विषय नाही. सेनेला तेवढी अक्कलही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना विरोध करण्यासाठीच शिवसेनेने या विषयाची काही जाण नसूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केले.

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी मंगळवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेच्या भूमिकेचा समाचार घेतला. राज्यात ‘भारत बंद’ आंदोलनाचा प्रभाव कुठेही दिसत नाही. शेती हा शिवसेनेचा विषय कधीही असू शकत नाही. शिवसेना केवळ विरोधाला विरोध करत आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले. (BJP leader Nilesh Rane take a dig at Shivsena)

‘कृषी कायद्यांना शरद पवारांचा विरोध अनाकलनीय’
कृषी कायद्यात बदल करावा, अशी मागणी 2010 साली शरद पवार यांनीच केली होती. त्यामुळे आता या कायद्यांना त्यांच्याकडून होणारा विरोध अनाकलनीय आहे. केवळ नरेंद्र मोदींनी हा कायदा आणला म्हणून त्याला विरोध केला जात आहे. फक्त पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधातील तीव्रता जास्त आहे. इतर कुठल्याही राज्यांमध्ये तशी परिस्थिती नसल्याचा दावा निलेश राणे यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’