…तर आजचा भाजप दिसला नसता ; ‘आंदोलनजीवी’ वरून राऊतांचा मोदींवर निशाणा

raut modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांना आंदोलन पुकारल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर बोलत असताना आंदोलनजीवी म्हणत त्यांचा एकप्रकारे अपमान करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून मोदींना भारतीय जनता पक्षानं केलेल्या विविध आंदोलनांची आठवण करून दिली आहे. आपला देश आंदोलनातूनच स्वतंत्र झाला, याचंही स्मरण राऊत यांनी मोदींना करून दिलं.

आणीबाणीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत. महागाईपासून कश्मीरातील 370 कलम हटविण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली. रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता, अशा रोखठोक शब्दांत राऊत यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. त्या भाजपचे पंतप्रधान मोदी ‘आंदोलनजीवी’ अशी खिल्ली उडवतात तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचाही अपमान होतो!

देशातील आंदोलने थांबवा. आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. ‘आंदोलनजीवी’ असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱया कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. ही थट्टा फक्त गाझीपूरला तीन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱया शेतकऱयांची नाही, तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱया प्रत्येकाची थट्टा आहे, अशा शब्दांत राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

गोध्राकांड काय होते?

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह हे आज ‘आंदोलना’ची खिल्ली उडवत आहेत; पण साबरमती एक्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले. मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्स्फूर्त आंदोलनच होते. हे आंदोलन ‘परजीवी’ आहे असे तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. त्याच ‘गोध्राकांड’ आंदोलनाने मोदी व शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले. त्या मानाने दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन शांत आणि सौम्य आहे. शिस्त पाळून आहे. हे आंदोलन ‘कॉर्पोरेट व्यवस्था’ आणि भांडवलदारांच्या विरोधात असल्यामुळे शेतकरी बदनाम केला जात आहे. ज्यांना आज शेतकऱ्यांचे आंदोलन नको आहे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तपासायला हवा. असं राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’