हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. 9 वर्षे राज्य करूनही पंतप्रधान मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे सर्व हिंदू देव लागतात. मोदी म्हणजे हिटलर आणि खोमेनीचे मिश्रण असून देशाला ते परवडणार नाही असं म्हणत राऊतांनी मोदींवर थेट हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकच्या प्रचारात यावेळी बजरंगबलीस उतरवले. जय बजरंगबलीचे नाव घ्या व भाजपसाठी मतदानाचे बटन दाबा. हा धार्मिक प्रचार आहे. असा धार्मिक प्रचार केल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांना सहा वर्षांसाठी मतदान करण्यास अपात्र ठरवले होते. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर केला म्हणून अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची लोकसभेची निवडच रद्द केली. इथे पंतप्रधानांपासून त्यांचे संपूर्ण कॅबिनेट सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचारात गुंतले आहे.
पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीत हिंदू-मुसलमानांचे कार्ड काढणे अपेक्षित होते. दिल्लीचे बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरण हा काही कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा विषय नव्हता, पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी बाटला हाऊस चकमक नव्याने सुरू केली. ते चालले नाही तेव्हा महाबली हनुमानास प्रचारात आणले. श्री. अमित शहा म्हणाले, ‘कर्नाटकात भाजप जिंकला नाहीतर दंगली होतील.
नऊ वर्षे राज्य करूनही पंतप्रधान मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे सर्व हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे व निवडणुका जिंकायच्या. हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. देश अशाने संपून जाईल व पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल. या एकाच विचाराने लोकांनी आता एकवटायला हवे. निर्भय व्हायला हवे! असं संजय राऊत यांनी म्हंटल आहे.