Monday, May 29, 2023

युतीसाठी शिवसेनेचा नवीन फॉर्म्युला ; भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई प्रतिनिधी |  भाजप शिवसेना युतीच्या चर्चा सध्या अशा वळणावर आल्या आहेत कि कधी ही युती तुटू शकते अथवा कधीही युती अंतिम होऊ शकते. शिवसेना कमी पणा घ्यायला तयार नाही आणि भाजप शिवसेनेला अधिकच्या जागा देण्यास तयार नाही अशा स्थितीत युतीचे काय होणार हा यक्ष प्रश्न आहे.

शिवसेना भाजप युतीचा शिवसेनेने नवीन फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला आहे. हा फॉर्म्युला म्हणजे भाजपचीच बोटे भाजपच्या डोळ्यात घालण्यासारखा आहे. कारण शिवसेना म्हणते आहे आम्हाला १४४ च्या एवेजी १३५ जागा द्या. १४४ च्या बदल्यात आम्ही १३५ वर युती करतो राहिलेल्या ९ जागा आम्ही मित्र पक्षाला सोडतो. अशा परिस्थितीत मुसद्दी भाजप शिवसेनेचा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही. कारण आयारामांना जोडीला घेऊन भाजपने स्वबळाची तयारी देखील पूर्ण केली आहे. त्यामुळे शिवसेनेने १२५ जागांच्या आसपास जागा घेऊन युतीसाठी होकार भरला तरच युती होऊ शकते. हे या राजकीय डावपेचाचे वास्तव आहे. मात्र शिवसेना ताणाताणी करण्यास महाचतुर आहे. त्यामुळे शिवसेना देखील भाजपला ताणण्याचा प्रयत्न करत आहे. तर भाजपने शिवसेनेचा ताण घेणे केव्हाच सोडले आहे. आता युतीच्या वाटाघाटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्या प्रमाणे सन्मानपूर्वकच केल्या जाणार हे मात्र नक्की.

मागील काही दिवसापूर्वी मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत युती बाबत उलट सुलट चर्चा करण्यात आली. यात युती नकरता शिवसेनेवर काय परिणाम होतील याबद्दल देखील बोलणी झाली. तर आदित्य ठाकरे यांच्या उज्वल भविष्यासाठी तुम्ही युती कराच असा सल्ला काही शिवसेना नेत्यांनी दिला आहे असे देखील सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे युतीच्या जागा विभाजनावर काय निर्णय घेतात हे बघावे लागेल. त्याच प्रमाणे भाजप देखील शिवसेनेच्या रणनीतीचा कसे समाचार घेते हे देखील बघण्यासारखे राहणार आहे.