हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळतोय. शिवसेना आणि धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा पडलाय. महाराष्ट्राचा घात झाला. मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न झालं आहे,” अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वस्वी केंद्र सरकार आणि अमित शाह दोषी असल्याचे सामनातून म्हंटले आहे.
देशात सत्य आणि न्यायाचे अक्षरशः धिंदवडे निघाले असून उघडपणे लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे. या आघातामुळे मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न झाल्याची भावना शिवसेना प्रेमींची आहे. मोदी शहांनी लिहिलेल्या पटकथेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने कठपुतळीचा खेळ खेळला आहे.
सामना वृत्तपत्रातून पाकिस्तानातील आर्थिक संकटावर भाष्य करण्यात आले आहे. आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या पाकिस्तानात आज एकिकडे गरीब जनता जगण्यासाठी पळापळ करीत आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानातील श्रीमंत लोकही देशाबाहेर पळून जात आहेत. कालपर्यंत आम्ही अण्वस्त्रसज्ज आहोत, म्हणून हिंदुस्थानावर डोळे वटारणाऱ्या व दहशतवादी कारवाया घडवणाऱ्या पाकिस्तानची आज अशी दिवाळखोर व कंगाल अवस्था झाली आहे. ही पाकिस्तानच्या कर्माचीच फळं आहेत, असेही सामनातून म्हंटले आहे.