शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं ही सर्वांची इच्छा पण इतकी आदळआपट का? ; शिवसेनेचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे पण इतकी आदळआपट करायची गरज नाही, असं म्हणत शिवसनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

फडणवीस यांचे म्हणणे असे आहे की, शर्जिलच्या मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणावे. शर्जिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळय़ांचीच इच्छा आहे, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी 90 दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. त्या हिंदू, शीख शेतकऱयांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा, असा उलट सवाल सामनाने फडणवीसांना विचारला आहे.

हा जो कोणी शर्जिल हिंदुत्वावर शिंतोडे उडवून गेला त्यास पुण्यात आमंत्रित करणाऱ्यांवर सर्वप्रथम कठोर कारवाई केली पाहिजे. शर्जिलसारख्या कमअस्सल अवलादीच्या बोकडांनी शिंतोडे उडवले म्हणून हिंदुत्वाचे तेज कमी होणार नाही, पण म्हातारी मेल्याचे दुःख नसून काळ सोकावत जातो. महाराष्ट्रात शिवसेना आहेच. सरकारचे सूत्रधार ठाकरे आहेत. त्यामुळे कायदा आहे तसा हाती दंडुकाही आहेच. म्हणूनच हिंदुत्वावर वाकडेतिकडे हल्ले कोणीच सहन करणार नाही, असं प्रत्युत्तर शिवसेनेने दिलं आहे.

हिंदुत्व विरोधकांच्या मुसक्या महाराष्ट्र आवळेलच, पण थोडी जबाबदारी योगी राज्याचीसुद्धा आहे. त्या पळून गेलेल्या व लपून बसलेल्या शर्जिलला महाराष्ट्र पोलिसांच्या हवाली करण्याची जबाबदारी त्यांची आहे व याकामी कोणी हस्तक्षेप करू नये. कारण महाराष्ट्राने एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करावी व इतर राज्यांतील भाजप शासकांनी त्या गुन्हेगारांना विशेष सुरक्षा कवच बहाल करावे, असे प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. शर्जिललाही विशेष संरक्षण मिळणार नाही ना?, ही शंका म्हणूनच आहे, असं म्हणत सामनाने योगींना टोला लगावलाय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment