आज दादा कोंडके असते तर फडणवीसांवर दुसरा ‘सोंगाड्या’ चित्रपट काढला असता…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा आणि मनसे असा संघर्ष पहायला मिळत आहे. अशात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आले आहे. तर भाजपा नेते किरीट सोमय्यांवर खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या सर्व घटनांवरून आज शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “दादा कोंडके असते तर त्यांनी नवा सोंगाड्या चित्रपट काढला असता, असा खोचक टोला शिवसेनेने लागवला असून ‘किरीट सोमय्या हे भाजपाचे नाच्या असून त्यांचे सुत्रधार फडणवीस आहेत,’ अशी टीकाही सामनातून केली आहे.

शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधत भाजपच्या सध्याच्या चाललेल्या राजकीय स्थितीवरून भाजपला खोचक टोलाही लगावला आहे. महाराष्ट्राचे मीठ फडणवीसांसह भाजपला आता बेचव लागू लागले आहे. आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी भाजपकडून जी कारणे दिली आहेत त्यावर काय बोलायचे ! दादा कोंडके हयात असते तर त्यांनी या बोगस कारणमीमांसेवर दुसरा ‘सोंगाड्या’ चित्रपट काढला असता,” असा टोला शिवसेनेने लागवला आहे.

दरम्यान, शिवसेनेने भाजपवर निशाणा साधताना म्हंटले आहे की, सध्या राज्यात अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. फडणवीस यांनी नुकतेच केंद्रीय गृहसचिवांना एक सविस्तर पत्र लिहिले आहे. त्यामागील कारण सांगायचे झाले तर फडणवीस यांच्यासह संपूर्ण राज्यातील भाजपा ज्या मानसिक संक्रमणावस्थेतून जात आहे ते पाहता त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येणार नसल्याचे शिवसेनेने म्हंटले आहे.