कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी 8 वर्षात तुम्ही काय केले? शिवसेनेचा मोदींवर निशाणा

0
104
uddhav thackeray modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाचे नेते झाले पण देशाचे पंतप्रधान कधी होणार?? असा खोचक सवाल करत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून मोदींचा समाचार घेतला आहे. काश्मीरचा प्रश्न नेहरूंना सोडवता आला नाही हे मान्य, पण मग 8 वर्षात कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? असाही प्रश्न सामनातून करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी हे जगातील एक महान नेते आहेत याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. मात्र त्यांना जगातील घडामोडींविषयी जितकी इत्यंभूत माहिती आहे, तेवढी आपल्या देशातील घडामोडींविषयी आहे काय, असा प्रश्न अनेकदा पडतो. भारतीय जनता पक्षाने मोदी यांना निवडणुका जिंकून देणारा यंत्रमानव बनवले आहे. पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. तेथील विधानसभा निवडणुका डोळयांसमोर ठेवून त्यांच्या दौऱ्याचे आयोजन व नियोजन भाजपने केले आहे. मोदी यांनी एका सभेत सांगितले की, “माझी जात वगैरे न पाहता गुजरातच्या जनतेने मला समर्थन दिले.” ऐन निवडणुकीत मोदी यांना आपल्या जातीची आठवण का व्हावी ? गुजरातला शहरी नक्षलवादाचा धोका वाढत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याचा विसर त्यांना गुजरातला गेल्यावर अनेकदा पडतो. मोदींचे पहिले विधान स्वतःच्या जातीविषयी आहे. पंतप्रधानांच्या मनात स्वतःची जात असावी हे बरे नाही असा टोला शिवसेनेनं लगावला.

मुळात गुजरातला सगळ्यात जास्त धोका अमली पदार्थांच्या तस्करीपासून आहे. गेल्या काही महिन्यांत हजारो कोटी रुपयांचे ‘ड्रग्ज ‘ गुजरातच्या विमानतळांवर आणि बंदरांवर सापडले. ही चिंतेची बाब आहे. हे सर्व रॅकेट सुरळीत सुरू आहे. दहा हजार कोटींचा अवैध दारूचा व्यापार गुजरातेत सुरू असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. हा आरोप नसून सत्यच आहे. याबाबतची सत्य माहिती पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्यात गुप्तचर खाते कमी पडले, की पंतप्रधानांपासून गुजरातबाबतचे सत्य लपवले जात आहे? पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादेत आणखी एक जळजळीत विधान केले ते कश्मीरविषयी. आपले पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील अनेक वेगवेगळी संस्थाने विविध राज्यांमध्ये विलीन केली. देश एकसंध केला, पण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना केवळ कश्मीरचा एक प्रश्न सोडवता आला नाही.

नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली. सत्ता मिळविली, मग गेल्या आठ वर्षांत नेहरूंची कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? ऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे का वाजवायचे? कश्मीरात गेल्या पाच महिन्यांपासून कश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग वाढले आहे. पंडित भयाच्या सावटाखाली वावरत आहेत. केंद्र सरकारने पंडितांना सुरक्षेची हमी दिली होती, पण पंडित मारले जात आहेत व पलायन करीत आहेत. यात नेहरूंचा काय दोष?

मागच्या आठवडय़ात गृहमंत्री श्री. अमित शहा कश्मीर दौऱ्यावर असताना राज्याच्या पोलीस महासंचालकांची हत्या झाली. हे आता रोजचेच झाले आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत अनंतनाग येथे पंडितांसाठी वसाहत उभी केली. तेथे तर आता स्मशानशांतता आहे. सुरक्षा कडे आहे, पण बाहेर पडल्यावर पुन्हा घरी परतण्याची खात्री नाही. कश्मीरमध्ये पंडित व इतर हिंदू जीव मुठीत धरून जगत आहेत. पंतप्रधानांपर्यंत ही सत्य माहिती पोहोचू नये याचे आश्चर्य वाटते असे म्हणत शिवसेनेने मोदींवर निशाणा साधला.