धक्कादायक !!! वृद्ध आईचा गळा आवळून खून करत मुलाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश परब

आष्टा शहरातील दत्त वसाहत येथे मुलाने आपल्या ८० वर्षीय वृद्ध आईचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वत:ही गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. श्रीमती रतन रामचंद्र कांबळे असे खून झालेल्या आईचे नाव आहे. शशिकांत रामचंद्र कांबळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सदरची घटना हि मंगळवारी रात्री घडली. या घटनेची नोंद आष्टा पोलिस ठाण्यात झाली आहे.

शशिकांत कांबळे हा पत्नी, दोन मुले व आई रतन कांबळे यांच्यासह आष्ट्यातील दत्त वसाहत येथे वास्तव्यास आहेत. शशिकांतचे वडील रामचंद्र कांबळे व आई रतन कांबळे दोघेही प्राथमिक शिक्षक होते. वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. त्यामुळे सध्या याठिकाणी श्रीमती रतन कांबळे या मुलगा शशिकांत, सून सुनीता व दोन नातवंडांसमवेत रहात होत्या. शशिकांत याचे आष्टा शहरात कापड दुकान आहे. मंगळवारी पत्नी व मुले माहेरी गेल्याने आई व शशिकांत दोघेही घरी एकत्र होते. शशिकांत यास दम्याचा आजार होता. यातून त्याला नैराश्य आले होते. या नैराश्यातून त्याने कॉटवर विश्रांती घेत असलेल्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला व या नैराश्यात तच त्याने दुसऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नी सुनिता ही वारंवार फोन करूनही शशिकांत फोन उचलत नसल्यामुळे ती आपल्या भावासोबत आष्टा येथे घरी आली. हाका मारुनही घराचा दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी घराचा दरवाजा मोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शशिकांत याने आईचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी शशिकांत याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून यात माझ्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे आईला सांभाळण्यास कोणी नसल्याने मी आईला माझ्यासोबत घेऊन जात आहे असे लिहिले आहे. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment