अहमदनगर । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आधी केंद्रनं आणि नंतर राज्य सरकारनं दारूची दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला आहे. सरकार नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडून देत आहे हे दुर्दैव आहे,’ अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अद्याप बरीच कामे करणे बाकी असताना केवळ महसूल मिळावा म्हणून दारूची दुकाने सुरू करणे ही सकारची विनाशकाले विपरित बुद्धी आहे’, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला फटकारले आहे
‘दारू ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही. ती मिळाली नाही तर लोक उपाशी मरणार नाहीत. मग सरकारला असा निर्णय अचानक का घ्यावा लागला? सध्याच्या परिस्थितीत सरकार दारू विक्री करून काय साध्य करणार? दारूतून मिळणाऱ्या महसूलापेक्षा करोनाचा धोका अधिक वाढणार असेल तर याचा काय उपयोग? गेले महिना दीड महिना दारू विक्री बंद होती. दारू न पिल्यामुळे कोणते नुकसान झाले? उलट दारू मिळत नसल्यानं नाइलाजाने का होईना लोक दारूपासून परावृत्त होऊ लागले होते, असं हजारे यांनी म्हटलं आहे. ‘तुम्ही लोकांना वाचवण्याचा विचार करणार की महसूल गोळा करण्याचा,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
लॉकडाउनच्या काळात उपासमार होत असलेल्या गरीब लोकांना रेशन व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यास सरकारनं प्राधान्य द्यायला हवं. सध्या हातावर पोट असलेली हजारो कुटुंबं बेरोजगार झाली आहेत. त्यांना रेशन नाही. इतर कोणताही आधार नाही. त्यांना आधार द्यायचा सोडून सरकार नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडून देत आहे हे दुर्दैव आहे,’ अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली. दारूमुळे भांडण-तंटे, मारामाऱ्या, चोऱ्या, महिलांवरील अत्याचार अशी गुन्हेगारीत होत असते असा इतिहास आहे. लॉकडाउनच्या काळात दुकाने बंद असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमालीचे घटल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत दारुची दुकाने उघडणे आजिबात योग्य नव्हते,’ असं हजारे यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”