सोनिया गांधींची उद्धव ठाकरेंशी चर्चा; काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा करत अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे अंधेरी पोटनिवडणूक लढणार आहे असंही ते म्हणाले.

महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला आहे . त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छाही दिल्या आहेत. राज्यातील भाजपची एकूण राजनीती आणि ज्यापद्धतीने त्यांनी महाराष्ट्र ताब्यात घेतला आहे ते पाहता जनता त्यांच्यावर नक्कीच नाराज आहे. त्याचा परिणाम अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिसेल असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान, कालच काँग्रेस नेते नाना पटोले, भाई जगताप आणि अमित देशमुख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले. शिवसेनेच्या उमेदवारासाठी काँग्रेस संपूर्ण ताकदीने प्रचार करणार असून जवळपास 50 ते 60 हजार मतांनी शिवसेनेला याठिकाणी विजयी करू असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शिंदे गटामुळे आधीच अडचणीत असलेल्या उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे मोठं बळ मिळाल आहे.