सोनिया गांधींचे मोदींना भावनिक पत्र; म्हणाल्या हातावर पोट असलेल्यांची काळजी घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । देशात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व छोटे-मोठे उद्योग बंद आहते. याचा सर्वात जास्त विपरीत परिणाम हातावरचं पोट असलेल्या सगळ्यांवर होत आहे. रोज कमावून खाणाऱ्या अशा लोकांना आता दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सतावत आहे. तेव्हा लॉकडाऊनच्या कालावधीत अशा सगळ्या लोकांची काळजी घ्या, या आशयाचं पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.

दोन पानांच्या आपल्या पत्रात सोनिया गांधी यांनी मोदींना लिहलं आहे, सध्या आपला देश एका कठीण काळाला सामोरा जातो आहे. अशात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. या लॉकडाउनचा परिणाम हातावर पोट असलेल्या सगळ्यांवरच झाला आहे. लाखो लोकांना या लॉकडाउनचे चटके सहन करावे लागत आहेत. अशा प्रसंगात भारताने आपल्याकडे असलेला धान्यसाठा खुला करावा आणि कुणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान मोदींना केली आहे.

मोदी सरकारने गरीबांना ५ किलो धान्य मोफत देण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य असून राष्ट्रीय अन्न-सुरक्षा कायद्यान्वये हा निर्णय घेण्यात आला आहे जो योग्यच आहे असं सोनिया यांनी पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, लॉकडाउनचा अनेक लोकांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे. त्यासाठी सोनिया गांधी यांनी मोदींना काही सूचना सुचवल्या आहेत. ५ किलो धान्याची मर्यादा ही १० किलोपर्यंत करण्यात यावी. तसेच सप्टेंबर २०२० पर्यंत हे धान्य मोफत द्यावे, ज्यांना अन्नासाठी वणवण करावी लागते आहे त्या सगळ्यांनाच हे धान्य उपलब्ध करुन द्यावे अशी सूचना त्यांनी पत्रात केल्या आहेत.

सध्या जे संकट देशावर घोंघावतं आहे त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सर्वाधिक झळ सहन करावी लागणार आहे. आपल्या देशाची लोकसंख्या २०११ पासून वाढते आहे. त्यामुळे अशा सगळ्यांना दोन वेळचे अन्न मिळेल याची व्यवस्था करावी. येत्या काळात धान्य महागण्याची चिन्हं आहेत. तरीही सरकारने थोडी झळ सोसावी आणि गरीबांना दोनवेळचे अन्न मिळेल यासाठी शक्य त्या सगळ्या उपाय योजना कराव्यात असंही सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”