हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले नाहीत तर प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असा इशारा दिला आहे. त्याच्या इशाऱ्यानंतर आता राज्य सरकारकडून भोंग्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून त्या आज जाहीर केल्या जाणार आहेत. सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धार्मिक स्थळांवर विनापरवाना भोंगा लावल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे,अशी माहिती गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गृह खात्याची नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस गृहमंत्री वळसे पाटील, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भोंग्यांच्या विषयावर सविस्तर चर्चा पार पडली. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत भोंग्यांच्या मुद्द्यावर समाजात कोणीही तेढ निर्माण करणार असेल तर कठोर कारवाई करा, असे थेट निर्देशच उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता यापुढे धार्मिक स्थळांवर विनापरवानगी भोंगे बसविण्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या भोंग्यांच्या आवाजाची मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली असून ती मर्यादा पाळणेही बंधनकारक असेल आणि मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
आता धार्मिक स्थळांवर विनापरवानगी भोंगे लावण्यात आले तसेच निश्चित करून दिलेली आवाजाची मर्यादा ओलांडली गेली तर राज्यात कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आज या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत.