सांगली | सांगली शहरात काही महिन्यांपासून घरफोड्या, मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, वाटमारी तसेच मुलींवर होत असलेल्या छेडछाडी बाबत असे अनेक गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका सविता मदने, महिला मोर्चा प्रदेश सदस्य स्मिता पवार, प्रथमेश वैद्य, शांतिनाथ कर्वे, श्रीकांत वाघमोडे, चंद्रकांत घुनके आदि पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अतिशय धक्कादायक आहे. विद्यमान आमदारांच्याच घरी जर का चोरीचा प्रयत्न करत असतील तर शहरातील सर्वसामान्य व्यक्ती या कश्या सुरक्षित राहतील? या वरील सर्व वाढत्या घटना पाहून चोऱ्या व दरोडा घालणाऱ्या आरोपीच्या मनात पोलिसां बाबतची भीती राहिलेली नाही हेच चित्र स्पष्ट दिसून येत आहे.
रस्त्यावरून रात्री ये-जा करणाऱ्या लोकांची आडवून लूटमार करण्याचे प्रमाण तसेच आठवडा बाजार मध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण महिलांचे चेन स्नॅचिंगचे प्रमाण हे देखील खूप प्रमाणात वाढले आहे या सर्व घटनांची गंभीर दखल घेऊन आपण तात्काळ शहरामध्ये दिवस व रात्रीची गस्त व निर्भया महिला पथकाची तात्काळ जास्तीची नेमणूक करावी व शहरातील होत असलेले गुन्ह्यांचे प्रमाण कमी करावे अशी मागणी करण्यात आली.