सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा-पंढरपूर एसटी बसवर मंगळवारी रात्री अज्ञांतांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा- पंढरपुर रस्त्यावरील म्हसवड नजिकच्या पिलीव घाटात चार- पाच अज्ञात दरोडखोरांनी एसटी व मोटरसायकल चालकावरही दगडफेक केली आहे. हा दरोडेखोरांचा लुटमारीचा डाव असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास म्हसवडनजीकच्या पिलीव घाटात दारोड्याच्या उद्देशाने झुडपात लपून बसलेल्या दरोडेखोरांनी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केली. यामध्ये पंढरपूरहून सातार्याच्या दिशेने येणार्या एसटी बसवरही दगडफेक करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात एका मोटरसायकल चालकासह एसटीच्या काचा फुटून त्यातील प्रवाशी जखमी झाले आहेत. तसेच चालकही जखमी असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत ही घटना घडलीय. माळशिरस व म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सातारा व सोलापूर परिसरात कोंबिंग ओपरेशन केले जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.