मुंबई | राहुल गांधींची ‘ भारत जोडो ‘ पदयात्रा नफरती माहोल दुरुस्त करून हिंदुस्थानात स्वच्छ, ऐक्याचा माहोल निर्माण व्हावा यासाठी असल्याचं सामना मुख्यपत्रात म्हणण्यात आलं आहे. भारत जोडो यात्रा कश्यासाठी काढली, याचं कारण सामना मधून सांगत राहूल गांधीना व त्याच्या यात्रेला पाठिंबा दिला आहे.
“देशात मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढत असून शेतकरी, मजूर आणि छोटे-मध्यम उद्योग अडचणीत आल्याची टीका राहुल गांधी करतात व ‘ भारत जोडो ‘ यात्रा अशा भूमिका घेऊन पुढे सरकत आहे. राहुल गांधी हे ‘भारत जोडो’ पदयात्रेत जे ‘टी शर्ट’ वापरत आहेत त्याची किंमत 41 हजार रुपये असल्याची माहिती भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केली. या अशा वक्तव्यांनी काय साध्य होणार? राहुल गांधी व त्यांचा काँग्रेस पक्ष त्यांचे काम करीत आहे. राहूल गांधींनी पाच हजाराचे टी शर्ट घातले काय किंवा ते उघडे फिरले काय, फरक पडत नाही. राहुलवरील टीका भाजपास मात्र उघडे पाडीत आहे.
राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते कश्मीर अशा ‘भारत जोडो’ यात्रेने भाजपची पोटदुखी वाढू लागली आहे. डोकेदुखी नैसर्गिक आहे. राजकीय पोटदुखी ही एक प्रकारच्या विकृत मानसिकतेतून जन्मास येते. पोटात व डोक्यात वळवळणारे किडे तोंडातून म्हणजे शब्दांतून बाहेर पडतात. भाजप प्रवक्त्यांनी असे किडे तोंडावाटे सोडायला सुरुवात केली आहे, असं म्हणत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.