राऊतांची भेट घेताच सुषमा अंधारेंनी सोमय्यांना दिले ‘हे’ आव्हान; म्हणाल्या की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी थेट किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. “राऊतांच्या मुलीच्या लग्नातील मेहंदीवाला आणि गजरेवाल्याचा हिशोब मागता, तर मग बीकेसीत जो मेळावा झाला. त्या मेळाव्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. तो खर्च कुणाच्या खात्यातून झाला याची चौकशी का करत नाही? माझ्या प्रश्नाची उत्तरे दिल्यास तुमचं शिष्यत्व पत्करेन, असे आव्हान अंधारेंनी दिले.

सुषमा अंधारेंनी आज राऊतांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोमय्यांना काही प्रश्न विचारले. “भावना गवळी असेल, प्रताप सरनाईक असेल यशवंत जाधव असेल या लोकांना तुम्ही सरकार स्थापन करण्यापूर्वी माफीया माफीया म्हणत होता. तुमचा गळा सुकला होता. त्यांना क्लिनचिट तर मिळालेली नाही. पण त्यांच्यावरती चार्जशीट कधी दाखल होणार आहे? ही कायद्याची मेख कळली पाहिजे. त्यावर किरीट भाऊ का बोलत नाही? असा सवाल अंधारेंनी केला.

आपला तो फेकू आणि दुसऱ्यांचा तो पप्पू, अशी अवस्था किरीट सोमय्यांची झाली आहे. कारण ते अनिल परब यांच्या बंगल्याबद्दल बोलत आहे. तो फार लांबचा पल्ला आहे. त्याअगोदर नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार आहात? तुम्ही इतरांना हिशोब विचारता तेव्हा भाजप आणि मित्र पक्षातील लोकांना हिशोब कधी मागणार आहात? याचे उत्तर सोमय्या यांनी द्यावे, असे अंधारेंनी म्हंटले.