हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजपनेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी निशाणा साधला आहे. “राज्यात अनेक प्रश्न आहेत, मात्र या सरकारला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसून, त्यांना केवळ मद्यविक्रीत रस आहे, अशी टीका राणा यांनी केली आहे.
नवनीत राणा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यात शेतकऱ्याचे प्रश्न, आर्थिक नुकसान भरपाई, कोरोनाचे वाढते प्रमाण अशा अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मात्र, त्याकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. परंतु दुसरीकडे किराणा दुकानात वाईन विक्रीला सरकारने परवानगी दिली आहे. यावरून सरकारला केवळ मद्य विक्रीत रस असल्याचे दिसून येते.
किरणामाल दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगीचा देण्याचा निर्णय शेतकऱ्याच्या हितासाठी आहे, असे सरकार म्हणते. सरकारला आता या सर्वांमधून वेळ मिळालाच तर त्यांनी राज्यातील इतर समस्यांकडे देखील लक्ष द्यावे, असा टोलाही राणा यांनी यावेळी लगावला आहे.