हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले. मात्र, आता गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीतीही व्यक्त केली आहे. त्यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढती कोरोना आकडेवारी लक्षात घेता आज टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबईत आज सकाळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातल्या कोरोनाच्या केसेस सातत्याने वाढत असून त्यामुळे सध्या काळजीचे वातावरण आहे. आम्ही सगळ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पण एकदा का कोरोना रुग्णांची संख्या वाढली की ती कशी पटकन हाताबाहेर जाते, हे आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लाटेदरम्यान बघितले आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे,असे म्हंटले.
अजित पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबाबत भीती व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री आठ वाजता कोरोनाबाबत तातडीची आढावा बैठक बोलवली आहे. या बैठकीस राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह टास्क फोर्सचे अधिकारी, डॉकटर उपस्थिती राहणार आहेत. या बैठकीत राज्यातील सध्याची कोरोनाची स्थिती व त्याबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच त्यानंतर निर्णय घेतले जाणार आहेत.