हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस यांची अवस्था ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशीच काहीशी झाली आहे किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा ‘खोका’ अवस्थेला ते पोहोचले आहेत असं म्हणत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. गेल्या सहा महिन्यांत भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज उघड होऊनही उपमुख्यमंत्री फडणवीस फक्त ‘आधीच्या सरकारने काय केले?’ हीच रेकॉर्ड वाजवून गुळगुळीत करीत आहेत. शिवसेनेसह विरोधी पक्षांतील अनेक आमदारांना अॅण्टी करप्शन म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या नोटिसा पाठवून चौकशांचा ससेमिरा मागे लावणे हे राजकीय सूडाचे लक्षण आहे असेही सामनातून म्हंटल आहे.
कोकणातले आमदार राजन साळवी व त्यांच्या कुटुंबीयांचा सरकारने असाच छळ चालवला आहे. आमदार वैभव नाईक, नितीन देशमुख यांनाही ‘अॅण्टी करप्शन’च्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. हे सर्व लोक मिंधे गटात सामील झाले नाहीत. त्यांनी आपले इमान विकले नाही. त्याची शिक्षा त्यांना दिली जात आहे. आता यावर श्री. फडणवीस हे नाकाने कांदे सोलत सांगतील की, ‘कर नाही त्याला डर कशाला?’ श्रीमान फडणवीस तुमचे बरोबर आहे, पण ‘डर’ आम्हाला नसून तुमच्या लोकांना आहे व तुमच्याच संरक्षणाखाली भ्रष्टाचाराचे कुरण फुलले आहे. दौंडच्या भीमा पाटस साखर कारखान्याचा 500 कोटींचा घोटाळा समोर आला. शेतकऱ्यांचा पैसा भाजप आमदार कुल यांनी ‘हडप’ केला. त्या पैशांचा अपहार झाल्याचे उघड होऊनही फडणवीस आमदार कुल यांची वकिली करताना दिसतात असा टोला ठाकरे गटाने लगावला.
ठाण्यातील एक पालिका अधिकारी आमदार आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने धमक्या देतो. त्यांना ठार मारण्याची सुपारी थेट अमेरिकेत देतो व तुमचे गृहमंत्रालय नाकाने कांदे सोलत बसलेय. श्री. फडणवीस यांची अवस्था ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशीच काहीशी झाली आहे किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा ‘खोका’ अवस्थेला ते पोहोचले आहेत असं ठाकरे गटाने म्हंटल.
दरम्यान, अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली त्यावरूनही सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. सौ. अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले? असा सवाल सामनातून करण्यात आलाय. जरी सौ. अमृतावहिनींनी यासंदर्भात आता एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण हे प्रकरण गंभीर आहे. प्रश्न इतकाच आहे की, या प्रकरणातील जे कोणी लाच देण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांची हे करण्याची हिंमत झालीच कशी? म्हणजेच या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे. ‘लाच’ देणे व घेणे यात गैर वाटत नाही अशी महाराष्ट्राची प्रतिमा झाली आहे व त्यामुळेच हे राज्य भविष्यात संतसज्जनांचे राहील काय, असा प्रश्न पडतो असं म्हणत सामनातून टीकेचे बाण सोडण्यात आलाय.